सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वुमेन सेल आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे (एमएसएफडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या नेतृत्व विकासावर पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन शुक्रवार, दि. 16 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
ही कार्यशाळा दि. 16 ते 20 डिसेंबर 2022 यादरम्यान विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलातील सभागृहात होणार आहे. शैक्षणिक संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी, नवीन व्यवस्थापकीय आव्हाने प्रभावीपणे हाताळण्यासाठी, महिलांचे नेतृत्व विकसित करून त्यांना कौशल्याने सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या असतील. यावेळी एमएसएफडीएचे समन्वयक निखिलेश भाकरे, विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती असेल. सोलापूर विद्यापीठ आणि एमएसएफडीए यांच्यावतीने पहिल्यांदाच हा राज्यस्तरीय महिला नेतृत्व क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, नागपूर, मुंबई, अमरावती, सांगली, सातारा, पुणे येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
या कार्यशाळेत पहिल्या दिवशी दि. 16 डिसेंबर रोजी महिलांच्या अभ्यासाविषयी दृष्टिकोन या विषयावर मुंबईच्या डॉ. शिल्पा चरणकर या प्रशिक्षण देतील. दि. 17 डिसेंबर रोजी महिला आणि प्रशासन यावर मुंबईच्या डॉ. रवीकला कामत या मार्गदर्शन करतील. दि. 18 डिसेंबर रोजी महिला आणि संशोधन या विषयावर नागपूरच्या डॉ. संपदा नासेरी या प्रशिक्षण देतील. दि. 19 डिसेंबर रोजी महिला आणि नेतृत्व यावर नागपूरच्या डॉ. मीना काळेले या प्रशिक्षण देतील. शेवटच्या दिवशी 20 डिसेंबर रोजी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या महिलांचे वैयक्तिक आणि कार्यालयीन भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ. अंजना लावंड, डॉ. ज्योती माशाळे, प्रा. तेजस्विनी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्यरत करीत आहे.