आज रामनवमी अर्थात प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव. यानिमित्ताने रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोलापूरतील विविध मंदिरात मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हुतात्मा स्मृति मंदिर तसेच हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सायंकाळी गीतरामायण आयोजित केले आहे. शहरातील विविध मार्गांवरून सुमारे 40 ते 45 मंडळे रामनवमीनिमित्त सायंकाळी मिरवणुका काढणार आहेत. बाळीवेस टेलिफोन भवन श्रीराम मंदिराच्या वतीने दुपारी शोभायात्रा तर सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पूर्व भागातील श्री राम मंदिरात दुपारी सिताराम कल्याण उत्सवाचे आयोजन केले आहे. नवी पेठ तसेच दक्षिण कसब्यातील श्री राम मंदिरात देखील विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. शोभायात्रा,पालखी सोहळा, भजन कीर्तन, मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रम ठिकाणी आयोजित कले आहेत. एकूणच आज सोलापूर शहर जय श्रीराम म्हणत भक्तीरसात न्हाहून निघणार आहे.

