सोलापूर : महानगरपालिकेच्या उजनी – सोलापूर पाइपलाइनला ठिकठिकाणी लागलेल्या गळतीची दुरुस्ती व अन्य कामांसाठी सोमवारपासून उजनी पंपगृह सुमारे 50 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होऊन एक दिवस लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली.
उजनी – सोलापूर दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीला उजनी पंपगृहाजवळ दोन ठिकाणी, वेणेगाव, सावळेश्वर, मोहोळ स्मशानभूमी, शिवाजीनगर, बसवंती पार्किंग व अन्य ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी तसेच पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील पॅनेल बोर्ड शिफ्टिंग व केबलिंग कामासाठी सोमवारी उजनी पंपगृह बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीसाठी अंदाजे 48 ते 50 तास लागणार आहेत. परिणामी उजनी पंपगृह येथे पाणी उपसा व मुख्य जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे सोमवारी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच सोमवारनंतर एका रोटेशनकरिता शहराला एक दिवस उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.