सोलापूर : उन्हाची तीव्रता लक्षात घेता महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळातर्गत असलेल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचा निकाल (प्रगतीपुस्तक) घरपोच देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हनुमंत जाधवर यांनी दिली.
सध्या कडक उन्हाळा आहे. यामुळे उन्हाची तीव्रता अधिक आहे. परिणामी विद्यार्थ्यांना त्याची बाधा होऊ नये. खारघर येथील उष्माघाताच्या घटनेनंतर आता प्रशासनही दक्षता घेत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.
दरम्यान, कडक उन्हामुळे महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या शाळातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरीच परीक्षेचा निकाल देण्यात येणार आहे. त्या त्या शाळेंमधील शिक्षक हे संबंधित विद्यार्थ्यांना घरी जाऊन परीक्षेचा निकाल देणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या त्यांना निकाल मिळणार आहे. या संदर्भात संबधितांना शनिवारी सूचनाही देण्यात येत असल्याचे महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हनुमंत जाधवर यांनी स्पष्ट केले.
240 शिक्षक देणार घरपोच प्रगतीपुस्तक !
सोलापूर महापालिकेत अंतर्गत असलेल्या विविध माध्यमांच्या 58 शाळांमध्ये एकूण 5 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच 240 शिक्षक आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्फत महाराष्ट्र दिनी घरपोच परीक्षेचा निकाल मिळणार आहे.