सोलापूर: बाजारात टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने मार्केट मधून घराकडे येत असताना अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यांच्या कडेला फेकून दिल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यात टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. या टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री ३ ते ४ रुपये दराने होत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकताच घराकडे परत येत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिले आहेत.
बाजारात टोमॅटोची विक्री प्रति किलो ३ ते ४ रुपये दराने होत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंढरपूर येथील बाजार समितीच्या लिलावात १५ रुपयाला तीन टोमॅटोची कॅरेट विक्री केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. टोमॅटोची अगदी कमी दरात विक्री होत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. काही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन टोमॅटोची लागवड केली होती, त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.टोमॅटो बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना मालवाहू टेम्पोच्या भाड्या एवढे ही पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत . टोमॅटो तोडणीसाठी लावलेल्या मजुरांचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे बाजारपेठ बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टरबूज, कलिंगड कवडीमोल दराने विकल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी उभी पिके शेतात गाडून टाकली होती. लॉकडाऊन ने शेतकरी अडचणीत आले असताना टोमॅटोच्या पिकाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.