स्वामी रामदेव यांनी साधला सोलापूरकरांशी ऑनलाइन संवाद
येस न्युज मराठी नेटवर्क : जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णासाठी योग प्राणायाम शिबिर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जिल्हा नियोजन भवनात शनिवारी सकाळी योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांच्यासह महापौर श्रीकांचना यंन्नम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार,उपायुक्त धनराज पांडे, पतंजलीच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे, महापालिका नगर अभियंता संदीप कारंजे, नगरसेविका संगीता जाधव, संतोष दुधाळ, नितीन मोरे, मोहन कुंभार, सुजाता शास्त्री, यांच्या उपस्थितीत ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाला.
यावेळी स्वामी रामदेव म्हणाले, आज दोन स्वामींचा योग जुळून आला आहे हा दुग्धशर्करा योगच मी समजतो. एकाच्या नावापुढे स्वामी आहे तर दुसऱ्यांच्या नावानंतर स्वामी आहे, त्यामुळे निश्चितच सोलापुर लवकरच कोरोनामुक्त होईल. आपले शरीर कमजोर आहे मात्र मनोबल आणि आत्मबल व्यवस्थित असल्यास कोणताही रोग आपोआप ठीक होतो, सकारात्मक विचारच आपल्याला कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत तारु शकतात. सकारात्मकतेला योगाची साथ दिल्यास मनाबरोबर शरीरही बलशाली होण्यास मदत होईल. त्यामुळे सकारात्मक विचारांचा वसा घेऊन व योगसाधना करून येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर मात करा. असे सांगताना रोज तुळशी आणि गुळवेल यांचा काढा घ्या. तसेच रोज सफरचंद, पपई आणि डाळिंब या फळांचे सेवन करा असा सल्लाही स्वामी रामदेव यांनी सोलापूरकरांना दिला.
सीईओ दिलीप स्वामी यांनी या आयोजना मागील उद्देश स्पष्ट करताना सोलापूर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर मध्ये सात हजार रुग्ण उपचार घेत आहेत मात्र मानसिक तणावाखाली राहिल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. हा मानसिक तणाव कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ताणतणाव मुक्त शिबिराचे आयोजन आम्ही केले आहे. “करो योग रहो निरोग” हा उद्देश ठेवून आपल्या पतंजली योग समितीच्या माध्यमातून आजपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर मधील उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन केले आहे त्यासाठी आपलं मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
यावेळी महापौर श्री कांचना यन्नम तसेच उपायुक्त धनराज पांडे यांनी सुद्धा आपले विचार मांडताना हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप कारंजे यांनी केले प्रारंभी प्रास्ताविक मध्ये सुधा अळळीमोरे यांनी योग साधनेमुळे मन खंबीर बनते आणि खंबीर मनाने कोणत्याही आजारास आपण हरवू शकतो. म्हणूनच रुग्णांना कोरोना आजारात मानसिक ताण कमी करण्यासाठी शहर व जिल्ह्यात कोविड केअर सेंटरवर योगशिबिर घेण्याच्या मनोदय होता आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सीईओ दिलीप स्वामी व महापालिका प्रशासनाने यास सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे एका मोठ्या कामास सोलापूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे असे सुधा अळळीमोरे म्हणाल्या.