सोलापूर : वाढते प्रदूषण, पेट्रोल-डिझेलच्या गगनाला पोहोचलेल्या किंमती आणि पर्यावरणाची होणारी हानी याबद्दल आपण नेहमीच चर्चा करतो. परंतु सोलापुरातील गरुड बंगला येथे राहणाऱ्या अनुप जोशी यांनी मात्र या सर्वांचा विचार करून इलेक्ट्रिकल व्हेईकल घेण्याचा पर्याय निवडला. या व्हेईकलसाठी त्यांनी रूफ टॉप सोलर बसविण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रिकल व्हेईकलसाठी महामंडळाकडून येणारी वीज वापरली तर ती क्लीन एनर्जी म्हणता येणार नाही . म्हणूनच जोशी यांनी क्लीन एनर्जी मिळवण्यासाठी रूफ टॉप सोलर बसविले . या सोलर मधून मिळणारी तीन किलो वॅट वीज त्यांच्या घरासाठी आणि गाडीच्या चार्जिंग साठी वापरली जाते. इलेक्ट्रिकल व्हेईकलला चार तास चार्जिंग केल्यानंतर ८५ किलोमीटर प्रवास करता येतो. यासाठी त्यांना चार युनिट सोलर एनर्जी खर्च करावी लागते . एका युनिटचे साधारण दहा रुपये धरले तर ८५ किलोमीटर प्रवासासाठी त्यांना ४० रुपये खर्च येतो. हा खर्च देखील सोलर एनर्जी मुळे शून्य होत आहे. दोशी यांना या रूफ टॉप सोलर मधून तीन किलोवॅट म्हणजे साधारणपणे तीनशे युनिट वीज दरमहा मिळत आहे. धूळ आणि धूर याबाबत आपण नेहमीच तक्रार करीत असतो. परंतु सोलर एनर्जी चा वापर इलेक्ट्रिकल व्हेईकलसाठी केला तर निश्चितच आपण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याकडे वाटचाल करत असतो. म्हणूनच अनुप जोशी यांचा हा प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे.

