येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. यामुळे सर्वसामान्यांसह सरकारचीही चिंता वाढत आहे. आज (गुरूवार) दिवसभरात ८ हजार ९९८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.६६ टक्के एवढा झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार १०९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८५,१४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.