सोलापूर: शहर व जिल्ह्यात गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या शुक्रवारच्या अहवालानुसार कोरोना बाधितांची संख्या २५० पेक्षा अधिक झाली आहे. सोलापूर शहरात नव्याने 130 व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ८१ पुरुष आणि ४९ महिला आहेत. रॅपिड टेस्ट मध्ये ६१तर rt-pcr टेस्ट मध्ये ६९जणांना करूना झाल्याचे आढळून आले आहे. सोलापूर शहरातील १०२ ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. इन्फ्लुएंझा लाईक इलनेस या आजाराचे ६८ रुग्ण संपूर्ण शहरात आढळून आले आहेत . वाढलेले तापमान तशातच दोन दिवस पडलेले ढगाळ हवामान आणि पहाटे पडणारी थंडी अशा विषम हवामानामुळे आजारी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढत आहे. अक्कलकोट रोड ,शेळगी, विजापूर रोड ,होटगी रोड, बाळे, जुळे सोलापूर आणि शहरातील बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. MIDC मधील विनायक नगर येथील ३७ वर्षाचा व्यक्तीचा मार्कन्डेय रुग्णालयात कोरोनाने मुत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधित झालेल्या १४९ व्यक्तींपैकी ९१ पुरुष आणि ५८ महिला आहेत . पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील ७२ वर्षाच्या वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात कारोनाने वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यामुळे प्रशासन अधिक चिंतेत पडले आहे. करमाळा ग्रामीणमध्ये ५४, माढा ग्रामीण मध्ये नऊ, माळशिरस ग्रामीण मध्ये ७, मोहोळ ग्रामीण मध्ये ७ आणि पंढरपूर ग्रामीण मध्ये ५ अशा तब्बल ८२ व्यक्तींना जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावांमध्ये कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने या रुग्णांना सोलापुरातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्या शिवाय सध्यातरी पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सोलापुरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमधील करण्यासाठी निर्माण केलेल्या स्वतंत्र वॉर्डातील आणि अतिदक्षता विभागातील बेड्स जवळपास पूर्णपणे रुग्णांनी भरून गेल्याचे दिसत आहे. इन्फल्युएंझा लाईक इलनेस बाधित रुग्णांसाठी सुरूवातीचा टप्पा असतो , हे रुग्ण पुढे कोरोना बाधित होतातच , असेही एका वैद्यकीय अधिकाऱ्याने स्पष्ट केले.