- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम
*जिल्ह्यात मागील महिन्यापासून 33 जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू
*जिल्हा परिषदेच्या स्व निधीमधून 15 लाखाची लंपी आजार प्रतिबंध लस खरेदी करण्यात आली
सोलापूर, दिनांक 4(जिमाका):- जिल्ह्यात मागील महिन्यापासून जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. लंपी आजार संसर्गजन्य असल्याने त्याच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, त्याबरोबरच जनावरांची तसेच गोठ्याची स्वच्छताही करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून 1544 गाय वर्ग पशुधन लंपी आजारामुळे बाधित झालेले आहे, त्यापैकी 1108 जनावरे बरी झाली असून आत्तापर्यंत 33 जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झालेला आहे. तर 403 जनावरावर उपचार सुरू आहेत. प्रशासनामार्फत लंपी आजार प्रतिबंधासाठी जनावरांना लस देण्यात येत आहे. लस खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या स्व निधी मधून 15 लाखाचा निधी मंजूर केलेल्या होता, त्यातून लस खरेदी केलेली असून लसीकरण मोहीम वेगाने सुरू असल्याची माहिती जंगम यांनी दिली.
माळशिरस तालुक्यात लंपी आजार बाधित जनावरांचे प्रमाण जास्त होते परंतु मागील काही दिवसापासून संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झालेले असून सध्या माढा तालुक्यात लंपी आजार बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, त्याबरोबरच जनावरांची स्वच्छता तसेच गोठ्यांची स्वच्छता ही ठेवावी. हा आजार संसर्गजन्य असल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी यावेळी सांगितले.