मोहोळ तालुका क्रीडा संकुलाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मौजे वडाळा येथे विस्तारित क्रीडा संकुलास मंजूरी
मुंबई : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी या भागात अधिक चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सर्व क्रीडाविषयक सोईसुविधांनी युक्त तालुका क्रीडा संकुल बनविण्याला प्राधान्य आहे. क्रीडा विभागाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील तालुका क्रीडा संकुलाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. मौजे वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील विस्तारित क्रीडा संकुलासाठी तत्वत: मंजूरी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालयात आज मंत्री बनसोडे यांनी मोहोळ क्रीडा संकुल आणि मौजे वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे तालुका क्रीडा संकुल होण्याबाबतची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार यशवंत माने, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे, उपसंचालक (क्रीडा) अनिल चोरमले, मोहोळ तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, उत्तर सोलापूर तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, संस्थेचे संचालक हरिभाऊ घाडगे, समाधान कारंडे, भाऊसाहेब लामकाने आदींची यावेळी उपस्थिती होते.

यावेळी मंत्री बनसोडे यांनी मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे शहर असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा असणे अपेक्षित आहे. क्रीडा विभागाने त्या अनुषंगाने सुधारित परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावा. त्यास राज्य शासन निश्चितपणे सहकार्य करेल. राज्य क्रीडा समितीच्या बैठकीत त्यास मंजूरी घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर सोलापूर तालुका क्रीडा संकुल सध्या सोलापूर महानगरपालिका हद्दीत येते. जेथे जागा अपुरी असल्यामुळे विस्तारीत क्रीडा सुविधा निर्माण करण्यास मर्यादा येत असल्याची बाब आमदार श्री. माने यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सध्या मौजे वडाळा येथे विस्तारित क्रीडा संकुलासाठी तत्वत: मंजूरी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव तालुका आणि जिल्हा पातळीवरुन तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.