जगातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांचा समर्पित सहभाग दिसून आला. भाविकांच्या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सोलापूरमधील १७ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची एक टीम १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागात तैनात करण्यात आली होती.
सोलापूरच्या या कर्मचाऱ्यांच्या टिमने केवळ प्रभावी गर्दी व्यवस्थापनातच नव्हे तर सुरळीत प्रवाशांच्या सुविधा सुनिश्चित करण्यातही योगदान दिले, जे भारतीय रेल्वे ज्या मानवी स्पर्शासाठी आणि वचनबद्धतेसाठी ओळखली जाते त्याचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या अनुकरणीय प्रयत्नांची दखल घेत, प्रयागराज विभागाने त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल या पथकाचा सत्कार केला.
परतल्यानंतर, पथकाने सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांची भेट घेतली आणि महाकुंभ दरम्यान सेवा करतानाचे त्यांचे अनुभव सांगितले .योगेश पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हणाले की, “महाकुंभातील आमच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना मिळालेला अनुभव हा मध्य रेल्वेला महापरिनिर्वाण दिवस, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि सिंहस्त कुंभ यासारख्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मेळाव्यांच्या रेल्वे नियोजनात खूप फायद्याचा ठरेल . त्यांचे योगदान भक्ती आणि श्रद्धेच्या क्षणांमध्ये समाजाची सेवा करण्याच्या रेल्वेच्या वचनबद्धतेचे साक्ष देते.”
सोलापूर विभागाला त्यांच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे, ज्यांच्या वचनबद्धतेमुळे मोठ्या मेळाव्यांमध्ये रेल्वे काळजी, सुरक्षितता आणि मानवतेच्या सेवेचे प्रतीक राहते.