२४ तासात गुन्हेगारांना पकडण्यात यश
येस न्युज मराठी नेटवर्क : कारंबा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ भोगाव गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत आक्टिवा मोटर सायकल वरून जाणाऱ्या महिलेस मारहाण करून तिच्या जवळील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या तीन आरोपींपैकी एकाने संबंधित महिलेवर जबरदस्ती करून बलात्कार देखील केला होता .
१८ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी तातडीने हालचाल करून चोवीस तासात आरोपींना पकडण्यात यश मिळवले आहे . या आरोपींपैकी एक जण देगाव येथे राहणारा असून त्याचा मित्र मुंबई येथे राहणारा आहे. आरोपींपैकी दोन जण अल्पवयीन असून त्यांच्याविरुद्ध या पूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत. देगाव येथील राहणाऱ्या आरोपीविरुद्ध सोलापूर शहरात चोरी, घरफोडी ,जबरी चोरी यासारखे १७ गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून गुन्हा करताना वापरलेली बुलेट मोटार तसेच संबंधित महिलेच्या अंगावरील चोरलेले सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली आहे.