अवकाळी पावसाने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी संस्थेचा यंदाचा मान्सूनबद्दलच्या अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटकडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 94 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
स्कायमेट या खासगी संस्थेच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस 858.6 मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या प्राथमिक अंदाजानंतर स्कायमेट पुन्हा मान्सूनचा अंदाज देणार आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज देशभरातल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. देशाच्या काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. हे भाग कुठले आहेत याबद्दल पुढच्या अंदाजात चित्र स्पष्ट होईल, असं स्कायमेटनं म्हटलं आहे.
एल निनोचा परिणाम मान्सूनवर होण्याचं भाकित अमेरिकेच्या हवामान संस्थेनं केलं होते. आता स्कायमेटने देखील पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग आपला अंदाज 15 एप्रिलला वर्तवेल त्यावेळी एल निनो असेल तर त्याची माहिती समोर येईल. एका अहवालानुसार भारतानं 2002, 2004, 2009 आणि 2012 या वीस वर्षांत जे काही दुष्काळ पाहिले ते एल निनोमुळेच आले. त्यामुळं पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात
घट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आत्ताच सावध होऊन सरकारनं उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.
पाऊस कमी पडला तर उपाययोजना करणार
दरम्यान, याबाबत विधीमंडळात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर यावर्षी कमी पाऊस पडला तर काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात मुख्य सचिवांना बैठक घ्यायला सांगितली आहे. त्याचा एक प्लॅन तयार करत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.