पंढरपूर : आसाम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि पंढरपूरचे नितीन खाडे यांनी आसाम राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. खाडे यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांना दिल्ली येथे खास कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.
आसाममध्ये अतिरेकी, जातीय आणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक काळात मतदारांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे मोठे आव्हान होते. या आव्हानांचा गांभीर्याने विचार करून खाडे यांनी यंत्रणा राबवली.
कोविड सह अनेक आव्हाने समोर असताना देखील खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आणि काटेकोरपणे यंत्रणा राबवली. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविड च्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली य़ेथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे…
- 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत कोविड 19 महामारीच्या काळातही एकूण 9 लाख 15 हजार 993 नवीन मतदार मतदार यादीत जोडले गेले.
- कोविडचा प्रार्दुभाव असूनही 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान 0.5 टकके ने वाढले. मतदानावेळी कोविड च्य़ा अनुषंगाने सर्वती काळजी घेण्यात अाली.
- मतदान कर्मचाऱ्याचा कोविड संबंधित मृत्यू झाला नाही आणि हिंसाचारात देखील कोणाचाही मृत्यू झाला नाही.
- निवडणूक निष्पक्ष आणि सुरक्षित पार पाडली गेली.