मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. या कलामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण असून भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे. या निकालावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला चांगलंच डिवचलं आहे. कर्नाटकातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पूर्णपणे झिडकारून लावलं आहे. हा मोदी आणि शाह यांचा पराभव आहे. त्यांनी पराभव स्वीकारावा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
कर्नाटकात काँग्रेस सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून मोदी आणि शाह यांचा हा पराभव आहे. या दोन्ही नेत्यांनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. पण तरीही कर्नाटकातील जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारलं आहे, असा संजय राऊत म्हणाले.