छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्ह विधाने केली जातात, या मुद्यांवर बोलताना सरकार काय बोळ्याने दूध पितं का? असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि तात्काळ कायदा पारित करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. तत्पू्र्वी गृहमंत्री अमित शाह यांचीही त्यांनी भेट घेतली होती. आता, याबाबत त्यांनी माहिती देत रायगडावरुन या कायद्याची घोषणा होऊ शकते, असे म्हटले आहे.
या महिन्यात 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून घोषणा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळं महत्व प्राप्त होईल, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, 12 तारखेला अमित शाह रायगडावरून या कायद्यासंदर्भात घोषणा करतील का, हे पाहावे लागेल.