मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारला महाविकास आघाडी सरकारकडून क्लीन चिट देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राज्य सरकारनं नेमलेल्या समितीकडून या योजनेत घोटाळा झाला नसल्याचा अहवाल राज्य सरकारला दिल्याचं सांगण्यात आलं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत, मला अतिशय आनंद झाल्याचं म्हटलं. तसंच चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही. पण, संपूर्ण योजनेला बदनाम करणं गैर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. मात्र, या योजनेला क्लीन चिट देण्यात आली नसल्याचं राज्य सरकारकडून आता स्पष्ट करण्यात आलं आहे.
स्पष्टीकरण काय?
27 आक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे सदर बातमी प्रसृत करण्यात आलेली आहे. परंतु, CAG ने उपस्थित केलेल्या मुद्दयांवर सचिवांनी आपली साक्ष नोंदविलेली आहे व ही आकडेवारी योजनेची अंमलबजाणी करणाऱ्या यंत्रणेने स्वतः दिलेली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजपा आमदार सुधिर मुनगंटीवार आहेत.