सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी सोमवारी रात्री उशिरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधाऱ्यात पोहोचले. हा बंधारा मंगळवारी भरून घेतला जाणार आहे. पुढील दीड महिना या बंधाऱ्यातील पाणी जपून वापरावे लागणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.
शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीतून १२ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले होते. सोमवारी दुपारी हे पाणी सादेपूरला पोहोचले सादेपूरहून रात्री उशिरा औज बंधाऱ्यात दाखल झाले. मंगळवारी सायंकाळपर्यंत औज बंधारा आणि चिंचपूर बंधारा भरून घेण्यात येईल. औजचे पाणी टाकळी इनटेकवेलमध्ये
घेण्यात येईल.
टाकळी पंपगृहातून पुरेशा दाबाने पाणीउपसा सुरू झाल्यामुळे शहराच्या हद्दवाढ भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल, असे चौबे यांनी सांगितले.