सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावातील पाणी गटारीतील पाण्यापेक्षा घाण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी रविवार पासून खूप मोठ्या प्रमाणावर मासे मरू लागले आहेत. पाण्यातील ऑक्सिजन पातळी कमी झाली की दरवर्षी माशांची जगण्याची धडपड सुरू होते. सोलापूर महापालिका सिद्धेश्वर देवस्थान तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे.

सोलापूर महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून हा तलाव परिसर सुशोभित करण्यासाठी सुमारे 18 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र तलावातील प्रदूषण नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत. वॉटर फाउंटन बसवणे, सिद्धेश्वर तलावात मिसळणारे घाण पाणी बंद करणे या बाबीकडे अजूनही लक्ष दिले नाही. अनेक भाविक निर्माण्य हार फुले या तलावात टाकतात त्यामुळे या पाण्याची पातळी अत्यंत खराब झाली आहे. चार चार ते पाच पाच किलोचे मोठे मोठे मासे मरून पडल्याचे दृश्य दिसत आहे. आता याची दुर्गंधी सुरू झाल्यामुळे या परिसरात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.