येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकाल जाहीर करतील. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निकाल येणे अपेक्षित आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल सुनावणार आहेत.
तीन महिने विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी
विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली.
या उलटतपासणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी प्रभू यांनी व्हीप बजावलाच नाही, सगळा बोगस कारभार असल्याचे सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. सुनील प्रभू यांच्या उलट तपासणीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांच्या उलट तपासणीला सुरुवात करताना प्रश्नांचा भडीमार केला. शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव आखला होता आणि हा एक नियोजित राजकीय कट होता हे रेकॉर्डवर आणण्याचा आपल्या प्रश्नांमध्ये रेकॉर्डवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तशा प्रकारची प्रश्न शिंदे गटाच्या आमदार खासदारांना विचारले.