सोलापूर, दि.1- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार निर्मित बीकॉम भाग तीनच्या पाचव्या सत्राच्या ‘सहकाराचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाला.
फडके पब्लिकेशन्सकडून प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे लेखन ज्येष्ठ लेखिका प्रा. डॉ. रूपा शहा आणि डॉ. बी. एच. दामजी यांनी केले आहे. शुक्रवारी कुलगुरू दालनामध्ये निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यावेळी लेखिका डॉ. शहा, डॉ. दामजी यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विकास कदम, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या कॅप्टन डॉ. कीर्ती पांडे, प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे, प्रा आर. एम. काझी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, लेखिका डॉ. रूपा शहा आणि डॉ. दामजी यांनी लेखन केलेल्या बीकॉमच्या सहकाराचा विकास या पुस्तकाचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या या पुस्तकात सहकाराविषयी विस्तृतपणे लेखन करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना निश्चितच अभ्यास करताना त्याचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लेखिका शहा यांनीही यावेळी पुस्तकाविषयी आपले मत व्यक्त केले. खूप छान प्रकारे हा पुस्तक तयार करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.