येस न्युज मराठी नेटवर्क : सरकार टिकणार की जाणार, मध्यावधी निवडणुका होणार की केवळ सत्ता बदलणार अशा चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने थेट मतदार संपर्काचे अभियान हाती घेतले आहे. राष्ट्रवादीने परिवार संवाद कार्यक्रम सुरू केला आहे, तर भाजपतर्फे बूथ संपर्क महाअभियान सुरू होत आहे.
राष्ट्रवादीच्या अभियानातून पदाधिकारी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत, तर भाजपची मतदारांच्या घरोघर पोहचण्याची योजना आहे. राष्ट्रवादीचे अभियान सुरू झाले असून भाजपचे ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद साधणार आहेत. दौऱ्याच्या १८ दिवसांमध्ये विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. आघाडीतील शिवसेना हा पक्ष सरकार आणि आघाडी सांभाळण्यात तर काँग्रेस पक्ष सत्तेतील वाट्यासाठी संघर्ष आणि पक्षांतर्गत गोष्टींमध्येच अडकला असल्याचे दिसून येते. भाजप आणि राष्ट्रीवादी या दोन्ही पक्षांची या आघाडीवरील सक्रियता मात्र निवडणुकीच्या दृष्टीने वेगळे संकेत देणारी मानली जात आहे.