बारा दिवसीय प्रशिक्षणात विविध स्तरातील स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग..
सोलापूर, – “नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात अडकलेल्या व्यक्तींचे बचाव कार्य करताना प्रशिक्षित व्यक्तींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. योग्य माहिती, योग्य व्यक्तीला, योग्य वेळी पोहोचवणे हेच आपत्ती व्यवस्थापनाचे मूलभूत सूत्र आहे,” असे प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, सोलापूर यांच्या वतीने बारा दिवसीय ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, हे प्रशिक्षण आयटस स्पोर्ट्स सेफ्टी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे सुरू आहे.
या प्रशिक्षणात होडी चालक-मालक, सामाजिक संस्था प्रतिनिधी, आशा वर्कर्स, महाविद्यालयीन युवक-युवती अशा विविध स्तरातील स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला आहे. प्रशिक्षणामध्ये आपत्तीची ओळख, आपत्तीचे प्रकार, CPR, जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवणे, स्ट्रेचर तयार करणे, प्राथमिक उपचार, प्रशासनाशी संपर्क, गर्दी नियंत्रण, पुरात बचाव कार्य, बोट हाताळणी, डोंगराळ भागातील बचावासाठी दोरीचा वापर, गाठी बांधणी यासारख्या विषयांवर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दिली जात आहेत.
प्रशिक्षणाचे समन्वयन इंडियन रेस्क्यू अकॅडमीचे फैय्याज मुलाणी, प्रशिक्षक प्रशांत शेंडे, प्रदीप ऐनापुरे आणि मोनिका शिंपी हे करत आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आपदा मित्र-सखी यांना प्रमाणपत्र व सुरक्षा कीट देण्यात येणार आहे.
“पंढरपूर येथील भिमा नदीत वाहून जाणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी मी पूर्वी प्रयत्न केले होते. तेव्हा कोणतेही प्रशिक्षण नव्हते. आता शास्त्रीय
पद्धती समजल्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवत इतरांचा जीव वाचवू शकतो, याचा आत्मविश्वास आला आहे.”
– गणेश कांबळे, प्रशिक्षणार्थी आपदा मित्र-सखी