मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने सोडलेल्या रसायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे आसपासच्या परिसरात रोगराई वाढत असल्याचा आरोप करीत या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केलेल्या आंदोलकांनी उपोषण मागे घेण्यासाठी कारखान्याच्या प्रशासनाला दहा लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संबंधित दोन महिलांसह सहा उपोषणार्थींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब पारवे (रा. दादर, ता. मोहोळ), वैशाली अरविंद बनसोडे (रा. नरखेड, ता. मोहोळ), विजय चंद्रकांत शिंदे (रा. लक्ष्मी पेठ, आमराई, सोलापूर), रमेश देवीदास पवार, गणेश बंडू आणि लक्ष्मी किशोर लोंढे (सर्व रा. सोलापूर) अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात जकराया साखर कारखान्यातील प्रशासन विभागात कार्यरत कर्मचारी सचिन महादेव कानडे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, यातील आरोपी तथा उपोषणार्थी जकराया साखर कारखान्याचे सभासद नाहीत वा तेथे राहणारेही नाहीत. कारखान्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही. मात्र तरीही कारखान्याने सोडलेल्या रसायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे आसपासच्या परिसरातील रहिवासी आजारी पडत आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जकराया साखर कारखान्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी बाळासाहेब पारवे व इतरांनी केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू केले होते. दरम्यान, जकराया साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाने सोलापुरात येऊन उपोषणार्थींची भेट घेऊन वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. साखर कारखाना हा हजारो शेतकऱ्यांच्या जगण्याचे साधन आहे. कारखान्याची विनाकारण बदनामी होत असून उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषणार्थींनी उपोषण सोडण्यासाठी दहा लाख रूपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे सांगितले. त्यामुळे या उपोषणार्थींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.