सोलापूर – शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्राविका संस्थानगर स्थित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विश्व णमोकार महामंत्र दिनाचे औचित्य साधून सर्व विघ्नविनाशक व सुख-शांती प्रदाता दिव्य णमोकार महामंत्राच्या सामूहिक पटणाने सारा परिसर दुमदुमदुमून निघाला.
या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात विश्ववंदनीय श्री 1008 भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेस पुष्पांजली समर्पित करून झाली. प्रशालेचे प्राचार्य श्रीयुत सुकुमार मोहोळे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संपूर्ण विश्वाला अहिंसा, अपरिग्रह, साद्वाद व अनेकांताच्या माध्यमातून सुख, शांती व समृद्धीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या भगवान महावीरांच्या अजरामर तत्वांवर व त्यागमय जीवनावर प्रकाश टाकला. जीवनात जर उत्कर्ष साधायचा असेल तर मनःशांती व एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असून ती मंत्राद्वारे कशी साधता येते यावर त्यांनी अत्यंत सुंदर असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रदान केले. आज प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच संपूर्ण स्टाफ पंचरंगी पंचा व शुभ्र वस्त्र परिधान करून या कार्यक्रमांमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झाला होता. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील जवळजवळ १५०० विद्यार्थ्यांनी अत्यंत भक्तीमय वातावरणात सुस्वर व तालासुरात 51 हजार वेळा दिव्य णमोकार महामंत्राचे पठण करून सारा परिसर निनादून सोडला. शरीर, मन व आत्म्याच्या शुद्धतेसह मंगलमय व पावन णमोकार मंत्राच्या मंत्रोच्चारणाची अद्भुत शक्ती यावेळी प्रत्येक जण अनुभवत होता. प्रशालेचा सारा परिसर पंचरंगी ध्वजेने व हार फुलांनी सुशोभित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा, प्राचार्य सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकर्षक व मनोहारी फलक लेखन कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षक अनंत बळ्ळे यांनी तर आभार क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांनी मानले.

