८ तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण
सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा २४ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये नवीन ७४८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालावधीत २२३४ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतल्या आहेत . या २४ तासात ३० जणांचा जिल्ह्यामध्ये मृत्यू ओढवला आहे. नवीन कोरोना बाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता करमाळा तालुक्यात ११३ , माढा तालुक्यात १२२, माळशिरस तालुक्यात १४६ असे नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण आढळले असून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून लागू केलेल्या कडक निर्बंधांचे परिणाम आता दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथील सव्वीस वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे . या व्यक्तीला १२ मे रोजी दुपारी २:१५ वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी त्याचे निधन झाल्याचे अहवालात म्हटले आहे.