सोलापूर : वीकेंड लॉकडाऊन च्या पहिल्या दिवशी शनिवारी विजापूर वेस, मधला मारुती या परिसरात पूर्णपणे शुकशुकाट होता . नेहमी गजबजनाऱ्या या बाजारपेठेत शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास फुल वाल्यांची दुकाने पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. विजापूर वेस चौकामध्ये दुचाकीवर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची बॅरिकेट्स लावून चौकशी करण्यात येत होती. नागरिकांकडे संचारबंदीच्या काळात जाण्यासाठीचा विशेष पास असल्याबाबत तसेच वाहन चालवण्याचा परवाना तपासण्यात येत होता. मार्केट पोलीस चौकी नजीकच्या दुधमार्केटजवळ शनिवारी ग्राहकांची खूपच कमी संख्या होती. दूध विक्रेते मोठ्या प्रमाणावर येऊन थांबले होते मात्र दूध खरेदी करण्यासाठी एखादाच ग्राहक येताना दिसत होते .त्यामुळे दररोज ५०
ते ५५ रुपये लिटर दराने विकले जाणारे दूध चाळीस रुपये लिटर दराने विकण्याची वेळ या विक्रेत्यांवर आली होती. सोलापूर शहराच्या आसपासच्या गावातून येणारे हे दूध विक्रेते उद्या रविवारी यायचे की नाही , याबाबत चर्चा करताना आढळले. संचारबंदी अतिशय कडक पद्धतीने राबवण्यात येत असल्याने दूध विक्री खरेदी करण्यासाठी रविवारी न येणेच सोयीस्कर पडेल, असेही एका विक्रेत्याने स्पष्ट केले.