सोलापूर शहरातील जवळपास 20 शिवभोजन केंद्रातील कारभार संशयास्पद आढळला असून या प्रकरणी अन्नधान वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सर्व केंद्र संचालकांना नोटीसा बजावल्या आहेत.
शहरातील या 20 शिवभोजन केंद्रामधून दरमहा साधारण 70हजार शिवभोजन थाळ्यांचे वितरण होते.
हे वितरण करताना ऑनलाईन फोटो अपलोड करून त्यासोबत बिल क्रमांक प्रणालीवर सादर करणे अनिवार्य असते.या सर्व माहितीची तपासणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने केली जाते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून बिलांच्या पडताळणी दरम्यान काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत.
काही बिले दोन ते तीन वेळा अपलोड झाल्याचे निदर्शनास आले. थाळ्यांचे फोटो व बिलांचे फोटो अस्पष्ट धुसर आहेत. अशी बिले रद्द करण्यात आली आहेत. या प्रकरणी संबंधित केंद्र संचालकांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून त्यांंच्या उत्तरावरून पुढील कारवाई निश्चित केली जाईल असे पडोळे यांनी सांगितले.
भविष्यात अशा गैर व्यवहारांना आळा घालण्यासाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये अधिक काटेकोरता आणण्याच्या तयारी पुरवठा विभाग करीत आहे.b

