सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागाच्या कामांची अद्यावत माहिती द्यावी – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील
सोलापूर – महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा दिनांक 19 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान सोलापूर जिल्हा दौरा नियोजित आहे. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अद्यावत माहिती तयार करून प्रशासनाला सादर करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या दौरा पूर्वतयारी आढावा बैठकीत श्री. पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी इतर मागास बहुजन विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनटक्के, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार सुहास कांदे असून विधान परिषद व विधानसभेचे मान्यवर 14 आमदार समिती सदस्य आहेत. ही समिती दिनांक 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान सकाळच्या सत्रात संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्या बैठकी घेऊन दुपारच्या सत्रात स्थळांना भेटी देतील. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची परिपूर्ण माहिती तयार करावी तसेच स्थळ भेटीच्या वेळी संबंधित अधिकारी यांनी उपस्थित राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनटक्के यांनी सर्व संबंधित विभागाने त्वरित अद्यावत माहिती उपलब्ध करून द्यावी असे सांगितले.