रसिकांनी अनुभवली वेदनांची ‘ उसवण ‘
सोलापूर : आयुष्यातील समस्या, जीवन जगण्याचा संघर्ष, व्यवस्थेने केलेला अन्याय आणि त्यातून शब्दबद्ध झालेली वेदना यातून सोलापूरकर रसिकांनी वेदनेची ‘उसवण’ अनुभवली. निमित्त होते प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत लेखक देविदास सौदागर यांच्या ‘ उसवण ‘ या कादंबरीच्या अभिवाचन आणि प्रकट मुलाखतीचे.
शनिवारी सायंकाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात प्रिसिजन फाउंडेशन आयोजित प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत हा कार्यक्रम झाला. प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते लेखक देविदास सौदागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रिसिजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी देविदास सौदागर यांची प्रकट मुलाखत घेतली. तर मार्तंड कुलकर्णी यांनी कादंबरीचे अभिवाचन केले.
शिलाई यंत्रावर कपडे शिवण्याचे काम करता करता लागलेला लिहिण्याचा लळा, ‘ कर्णाच्या मनातलं ‘, काळजात लेण्या कोरताना ‘ या दोन कवितासंग्रहाच्या निर्मितीचे रंजक किस्से, कवितेकडून कादंबरीकडे झालेला प्रवास, उसवण कादंबरी ची निर्मिती अशा अनेक मुद्द्यांवर लेखक देविदास सौदागर यांना माधव देशपांडे यांनी बोलते केले. मुलाखती दरम्यान १३ भागांमध्ये कादंबरीतील विविध प्रकरणांचे अभिवाचन झाले.
यावेळी कादंबरीचे लेखक देविदास सौदागर म्हणाले, संवेदनशील माणसांचा समाज हा सर्वोत्तम समाज मानला जातो संवेदनशील समाज निर्मितीसाठी पुस्तके सर्वात महत्त्वाची आहेत. पुस्तक हा मानवाचा सगळ्यात चांगला मित्र आहे. वाचणारा माणूस एकवेळ सकारात्मक काही करणार नाही. परंतु तो नकारात्मक कृती किंवा आत्महत्येचे पाऊल निश्चितच उचलणार नाही. त्याकरिता पुस्तके वाचली पाहिजेत.
उसवण कादंबरी हे आत्मकथन नसून कपडे शिलाई करण्याच्या क्षेत्रातील अनेक शोषितांच्या अनुभवविश्वाचे कथन आहे. आयुष्यातील अनुभव कवितेतून मांडण्यास मर्यादा येत असल्याने कादंबरीच्या माध्यमातून त्या मांडल्या. साहित्याला पुरस्कार मिळाल्याने वेदना संपत नाही. तर शोषितांच्या वेदना संपणे हा खरा पुरस्कार आहे, असेही लेखक देविदास सौदागर यांनी याप्रसंगी सांगितले. प्रिसिजन जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. या अभिवाचनाच्या कार्यक्रमास सोलापूरकर रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला.