मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असून मराठा आंदोलक आता सर्वपक्षीय नेत्यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलवरुन भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत आहेत. त्याच अनुषंगाने आज काही मराठा आंदोलक मातोश्रीवरही गेले होते. त्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासह धारावी प्रकल्प आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केले. आरक्षणाच्या मर्यादा वाढविण्याचा अधिकार राज्यांना नाही. यापूर्वी बिहारला आरक्षण दिलं होतं, ते कोर्टाने उडवलं. त्यामुळे, आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर हा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो. मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत यायला तयार आहे. मराठा, ओबीसी सर्वच समजाने मोदींकडे गेलं पाहिजे. कारण, मोदी हे स्वत: सांगतात की, मी मागास प्रवर्गातून येतो. लहानपणी ते गरिब होते, त्यांना गरिबीतला संघर्ष माहिती आहे. त्यामुळे, आरक्षणाच्या बाबतीत मोदी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
आरक्षण वाढविण्यासाठी लोकसभेत काही तोडगा निघत असेल, तर आज मी सर्वमान्य पाठिंबा द्यायला तयार आहे. मला प्रामाणिकपणे मराठा आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे, असं वाटतं. पण, तो न्याय त्यांना राज्यात हे राज्यकर्ते असताना मिळेल, असं वाटत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नाही. मराठा आरक्षण हे ससंदेतून द्यावे लागेल, असे म्हणत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, आरक्षणावर मोदींनी तोडगा काढावा, मी पाठिंबा देईन, असे म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं. आपण इकडे एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा सर्वांनी एकदा दिल्लीत जाऊन मोदींपुढे हा प्रश्न मांडला पाहिजे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.