येस न्युज मराठी नेटवर्क : पुण्यात उभारलेलं मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एका समर्थकाने मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती. औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे.
भाजपाने संबंध नसल्याचं केलं होतं स्पष्ट
पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं होतं. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला होता. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.