पुणे: भाजपच्या फुग्याला भोक पडलं आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे. आमच्या नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चूक झाकण्यासाठी भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य लावून धरण्यात आलं. केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडलं. आमच्या नाही. आम्ही ‘सामना’च्या अग्रलेखाला किंमत देत नाही. राऊतांचं सकाळचं प्रवचन ठरलेलं आहे. राऊत तुमच्यावर एका महिलेने आरोप केले, तिला जेलमध्ये जायला भाग पाडलं. किती हा सत्तेचा दुरुपयोग, अशी टीकाही पाटील यांनी केली.
पुन्हा यात्रा सुरू होईल
भाजप कधीही मनात खुन्नस ठेवून लाँग टर्म काम करत नाही. रात गई बात गई. राणेंना जामीन झालेला आहे. राणेंची खूप तब्येत बिघडली. जेवताना त्यांच्या हातातील ताट काढून घेण्यात आलं. हे अमानवी होतं. त्यांचं बीपी वाढलं होतं. त्यांना कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट दिली नाही. अडीच तास संगमेश्वर पोलीस ठाण्यात बसून ठेवलं. हे अत्यंत अमानवी झालं. ते एखाद दिवस आराम करतील. शुगर, बीपी नॉर्मल झालं की बहुदा उद्या यात्रा सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं.
संपूर्ण राज्यातच संचारबंदी लावा ना
सरकार किती घाबरट आहे. काल रात्री 12 वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. अरे वा सिंधुदुर्गातच प्रॉब्लेम आहे का? संपूर्ण महाराष्ट्र पेटला. सगळीकडेच संचारबंदी लावा. संचारबंदी लावल्याने काय होतंय? राणेंच्या यात्रेला मुंबईत प्रचंड प्रतिसाद मिळाला. महापालिका हरली तर काय राहीलं? असं वाटल्यानेच त्यांनी हा प्रकार केला. हे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा हा प्रयत्न आहे. राणे एवढे ठोकतात तुम्ही काहीच बोलत नाहीत. त्यामुळेच हा लटका प्रयत्न झाला. त्यातूनच सिंधुदुर्गात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्याने आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. राणेंच्या तब्येतीमुळेच आम्ही थांबलो. उद्या सकाळी त्यांची तब्येत बरी झाली तर जन आशीर्वाद सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं.