येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक किस्से मोठे रंजक घडले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पतीस खांद्यावर नेणारी पत्नी असो, किंवा जेसीबीच्या फळ्यावरील मिरवणूक असो. विजयी उमेदवाराने आपला विजय साजरा करताना भन्नाट गोष्टी केल्या. मात्र लातूर जिल्ह्यातील पराभूत झालेल्या उमेदवाराच्या बॅनरनं या विजयी उमेदवारांनाही मागे टाकलं आहे. विकास शिंदे यांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. कारण बॅनरवरील त्या उमेदवाराचं मनोगतच अफलातून आहे.
बॅनरवर लिहिल्याप्रमाणं हा उमेदवार म्हणतो,
‘वाटलं होतं गड्या आपला गाव बरा ….पण तुम्ही म्हणलो पसारा भरा ….आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा.
समाजाने नाकरल… गावानं नाकरलं, मात्र आम्हाला देश स्वीकारणार…’
पराभवाचे हे शल्य असं लिहून बॅनरवर, आपल्याला मिळालेल्या अवघ्या 12 मतांसाठीही या पठ्ठ्यानं मतदारांचे आभार मानले आहेत. ‘सात जन्म तुमचे हे उपकार विसरणार नाही’, असं लिहलेले बॅनर गावात लावले.
‘तुमच्या मताचे देशात नाव करीन’, असं वाक्यही त्यात होतं. हे बॅनर अल्पावधीतच सोशल मीडियात व्हायरल झालं. संपूर्ण राज्यात ‘त्या’ बारा मतदाराच्या मताचं नाव झालं. ही किमया करणारा तरुण आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोनाळी डोंगर येथील विकास शिंदे कोनाळीकर.