सोलापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेचा सण यंदा शुक्रवारी साजरा होणार आहे. अक्षय तृतीयेसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे चारशे ते साडेचारशे क्रेट केशर आंब्याची आवक झाली आहे. या सणासाठी आंब्याला मोठी मागणी असल्यामुळे फळांचा राजा आंबा बाजारामध्ये भाव खात असल्याचे चित्र दिसून आले.
अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्याचा प्रघात असल्याने हा सण साजरा करण्यासाठी घरोघरी आमरस पुरीचा बेत केला जातो. यंदा शुक्रवारी अक्षय तृतीया आहे. या निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आज सुमारे चारशे ते साडे चारशे क्रेट केशर आंब्याची आवक झाली होती. आज झालेल्या लिलावामध्ये किरकोळ विक्रेत्यांनी आंबा चढाओढीने खरेदी केला.
नवीपेठ बाजारामध्ये केशर आंबा १५० ते २०० रुपये, लालबाग १०० ते १५० रुपये, बदाम ८० ते १०० रुपये, मल्लिका १२० ते १५० रुपये, कर्नाटक हापूस १२० ते १५० रुपये तर तोतापुरी ६० ते ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री केला जात होता. अक्षय तृतीयेसाठी आंब्याला मोठी मागणी असल्यामुळे आज बाजारामध्ये फळांचा राजा आंबा भाव खात असल्याचे चित्र दिसून आले.