कोल्हापूर ( सुधीर गोखले) – कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टी मुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले असून तब्बल ५७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे बाकीच्या छोट्या मोठ्या धरणांचा विसर्ग मिळून सुमारे ८००० क्युसेक्स पाणी कोल्हापूर च्या दिशेने झेपावत आहे हे पाणी साधारणपणे यायला पंधरा ते वीस तासांचा कालावधी लागेल त्यामुळे कोल्हापूरवासियांनी विशेषतः पंचगंगा काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कोल्हापूर चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येस न्युज मराठी शी दूरध्वनी वरून बोलताना केले आहे. ते पुढे म्हणाले आज राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून पंचगंगा नदीच्या पातळीत पाच फुटांनी वाढून ४५ फुटापर्यंत जाऊ शकते ज्या भागामध्ये पुराचे पाणी शिरते तेथील लोकांना आज दुपारी सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राधानगरी धरणातील पाणी भोगावती नदीतून पंचगंगेला मिळायला आणि कोल्हापूर कडे यायला १५ तासांचा तर कोल्हापूर मधून इचलकरंजी कडे पोचायला ६ ते ८ तास लागतात आणि शिरोळ जवळ पोचायला ५ ते ६ तास लागतात. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून कोल्हापूर, हातकणंगले इचलकरंजी, शिरोळ येथील स्थानिक प्रशासनाला अलर्ट देण्यात आला आहे.
अलमट्टी ५१७ मीटर वर स्थिर योग्य समन्वयाचा परिणाम
अलमट्टी धरणातील पाणी पातळी आज ५१७ मीटर वर काही अंशी स्थिर असून महाराष्ट्र कर्नाटक राज्यामधील सिंचन विभागामधील चांगल्या समन्वयाचा परिणाम दिसून येत आहे दोन्ही राज्यांमध्ये १५ ऑगस्ट पर्यंत अशीच पाणीपातळी स्थिर ठेवण्यावर निर्णय झाल्याचे समजते.