सोलापूर । गिरीश गोरे : स्मार्ट सिटी चे कामे सोलापुरात चालू असून त्या कामामुळे सोलापूर करांचे अतिशय हाल होत आहेत आहेत .अनेक ठिकाणी खडी टाकून ठेवल्यामुळे रस्त्यांवरून दुचाकीचा चालवणे अत्यंत धोकादायक बनत आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन वरून स्मार्ट सिटी ने दिलेल्या निळ्या पाईपमधील कनेक्शन्स जोडण्यात न आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत आहे. त्याचप्रमाणे अनेक भागात पाईपलाईन मध्ये लिकेज असल्याने हे पाणी जमिनीतून रस्त्यावर येत आहे . लकी चौकातून नवीपेठ कडे जाताना रस्त्यावर कारंजे लावले आहे का असा आभास निर्माण होत आहे.सोलापूरकरांना ही कामे आता कधी संपणार आणि शहर खरोखरच स्मार्ट होणार का? असे प्रश्न पडू लागले आहेत.
वारंवार खोदाई धुळीचे साम्राज्य आणि अनेक ठिकाणी पूर्ण रस्त्यांपैकी निम्म्या रस्त्यावर चालू असलेले काम यामुळे लकी चौक, लक्ष्मी मंडई परिसर, अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर आजोबा गणपती परिसर या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर समोरील रस्ता देखील अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे रंगभवन वरून विजापूर वेसमार्गे मधला मारुती कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. स्मार्ट सिटी ची कामे अधिक वेगाने होणे आवश्यक आहे. विशिष्ट कालावधी निश्चित करून एकेक काम हाती घेऊन ते पूर्णत्वास नेण्यासाठी स्मार्ट सिटीने लक्ष पुरवणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटीची संपूर्ण शहरात जी कामे चालू आहेत. त्यावर देखरेख करण्यासाठी अवघे तीन सिव्हिल इंजिनियर्स कार्यरत आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील तसेच रस्तेदुरुस्ती विभागातील अधिकाऱ्यांच्या स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा समन्वय दिसून येत नाही.