जिल्ह्यात नवीन १६५६ कोरोना बाधित, २७ जणांचा मृत्यू
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा तीन मे रोजी चा कोरोना अहवाल पाहिला असता ज्या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली हे दोन्ही तालुके हॉटस्पॉट ठरले आहेत. पंढरपूर मध्ये ३१४ नवीन व्यक्तींना २४ तासात कोरोना झाला आहे . त्यापैकी पंढरपूर शहरातील १३३ आणि ग्रामीण भागातील १८१ व्यक्तींचा समावेश आहे. मंगळवेढा तालुक्यात नवीन ८९व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून मंगळवेढा शहरात २३ जणांना आणि ग्रामीण भागात ६६ जणांना कोरोना ची लागण झाली आहे.
२४ तासात पंढरपूरमधील ८, मंगळवेढ्यातील ५ अशा १३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे.सोलापूर जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा अहवाल तीन मे रोजी प्राप्त झाला असून नवीन १६५६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २४ तासांच्या कालावधीत २७ जण मृत्युमुखी पडले असून याच कालावधीत १५५२ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. करमाळा तालुक्यात २१५, माढा तालुक्यात २६७, माळशिरस तालुक्यात २६० आणि बार्शी मध्ये १९० नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील २७ मृतांमध्ये पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील ३५ वर्षाची व्यक्ती, सांगवी येथील ३९ वर्षांची महिला, उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील ३३ वर्षांची व्यक्ती, गावडी दारफळ येथील ३५ वर्षांची व्यक्ती आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील ३५ वर्षांची व्यक्ती असे पाच जण ४० पेक्षा कमी वयाचे आहेत. संचारबंदीचे आदेश कडक केलेले असून देखील जिल्ह्यामधील कोरोना बाधितांची संख्या कमी होत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.