पंढरपूर : विठ्ठल मंदिराचा हा विकास आराखडा पुरात्त्व विभागाकडून मंजूर होऊन मंदिर समितीकडे आला होता. मंदिर समितीनेही या आराखड्याला मान्यता देऊन राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. आता 700 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे स्वरूप पुरातत्व विभागाच्या मदतीने दिले जाणार आहे. या विकास आराखड्यात सर्वात महत्वाचा बदल नामदेव पायरी महाद्वार येथे होणार असल्याची माहिती पुढे येत होती.
नामदेव पायरी जवळील महाद्वार हे अलीकडच्या काळात बनविले गेल्याने तेथे आर सी सी पद्धतीचे बांधकाम केलेले आहे. आता हे काढून या ठिकाणी संपूर्ण पुरातन दगडी बांधकामात महाद्वार उभारायची योजना होती . मात्र ही जागा अतिशय महत्वाची असून येथे संत नामदेव यांच्या कुटुंबातील 13 सदस्य आणि जनाबाई अशा 14 जणांच्या संजीवन समाधी आहेत. मंदिराचा हा विकास आराखडा करताना या समाधीला धक्का लागण्याची शक्यता असल्याने आता सध्याचे महाद्वाराची खालची बाजू तशीच ठेऊन त्यावर दगडी क्लॅडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महाद्वाराच्या वरचा भाग मात्र पडून तेथे दगडी बांधकामात 6 शिखरे केली जाणार असल्याचे मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर सांगतात . विठ्ठल मंदिर आराखडा राबविताना वारकरी संप्रदायाला विश्वासात घेण्याची मागणी देखील वारकरी संतांकडून केली जात आहे. विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे स्वरूपात पाहणे हे वारकरी संप्रदायाची अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र नामदेव पायरी पासून विठ्ठल गाभाऱ्यापर्यंत जे बदल होणार आहेत. ते संप्रादयाला विश्वासात घेऊन करण्याची मागणी राणा महाराज वासकर यांनी केली आहे. या विकास आराखड्यात संत नामदेव महाद्वाराबाबत आम्ही उत्सुक असून येथे होणारे बदल कसे असणार याची माहिती आम्हाला समजावी अशी मागणी नामदेवांचे 17 वे वंशज असणारे राम महाराज नामदास यांनी केली आहे.
एकंदर 62 कोटी 50 लाख रुपये खर्चाचा हा आराखडा पुढील पाच वर्षात राबविला जाणार असला तरी यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा निधीचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून विठ्ठल मंदिर बंद असल्याने जवळपास 60 कोटी रुपयाचा तोटा झाला आहे . आता हा विकास आराखडा राबविण्यासाठी राज्यभरातील विठ्ठल भक्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीच्या महापूजेला आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आराखड्यास मंजुरी आणि निधीसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते .