सोलापूर प्रतिनिधी दि 6 जुलै जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पंचायत समिती , उत्तर व दक्षिण सोलापूरच्या आयोजित करण्यात आलेल्या सर्व विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) परमेश्वर राऊत , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) चंचल पाटील , मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार , महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी सुनिल कटकधोंड , पंचायत समिती दक्षिण सोलापूर चे गट विकास अधिकारी राहूल देसाई , पं.स.उत्तर सोलापूरच्या गट विकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले , ग्रामीण भागात जिल्हा परिषद अंतर्गत शासनाच्या विविध योजना राबविताना विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वय व असंवेदना जागृत ठेवून काम करणे गरजेचे आहे.आज कोरोनाची परिस्थिती कमी होत असताना शिक्षण , आरोग्य , पाणी पुरवठा , स्वच्छ भारत मिशन ,जल जीवन मिशन, रोजगार हमी योजना , ग्रामीण जीवन्नोती अभियान ,लघु पाटबंधारे , ग्रामपंचायत, महिला व बाल कल्याण आदी विभागाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.या योजनेमध्ये प्रगती कमी असल्याने यावेळी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.सदर योजनांचे काम येत्या पंधरा दिवसात प्रगतीपथावर असले पाहिजे अन्यथा संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्याची सुचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) परमेश्वर राऊत यांनी ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या आरोग्याशी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हे निगडीत असल्याने सदरची कामे प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.