संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा आज पार पडत आहे. या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झालेत.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.. या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झालेत. आज 375 वी तुकाराम बीज आहे. तुकोबारायांनी ज्या स्थळावरून वैकुंठगमन केलं त्या स्थळावर नांदुरकी नावाचं वृक्ष आहे. तुकाराम बिजेला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो, याची अनुभूती वारकरी आणि भाविकांना येते, असं सांगितलं जातं. त्यामुळे या वृक्षाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वारकरी प्रामुख्याने शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. याच वातावरणात शेतकरी तुकोबारायांना साकडं घालणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात किर्तनाने होणार आहे. त्यानंतर या दिमाखदार सोहळ्यापुर्वी तुकोबारायांच्या पादुकांची आरती केली जाईल. काही अंतरावर असलेल्या तुकारामांच्या वैकुंठ गमन मंदिरात पालखी काढण्यात येईल. पालखीदेखील असते. या पालखीत दरवर्षी हजारो नागरिक सहभागी होतात. किर्तनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा साडे अकराच्या सुमारास पालखी मंदिराकडे रवाना होईल आणि दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर होईल. वारकऱ्यांच्या समजुतीप्रमाणे नांदुरकी वृक्ष थरारला की तुकोबा सदेह वैकुंठ गमनास गेले असा त्याचा अर्थ होईल आणि वारकरी तुकोबांना नमस्कार करुन पुन्हा आपापल्या कामाला लागतील.
सोहळ्यासाठी मोठा बंदोबस्त
या सोहळ्यासाठी एक अप्पर पोलिस आयुक्त, एक पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, 19 पोलिस निरीक्षक, 25 सहायक पोलिस निरीक्षक, 130पोलिस कर्मचारी, दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दोन शीघ्र कृतिदल असा पोलिस बंदोबस्त असणार आहे. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि साध्या वेशात 50 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.
हजारो वारकरी देहूत दाखल
या बीजोत्सवासाठी शेकडो वारकरी देहूत दाखल झाली आहेत. कोरोनामुळे दोन वर्ष हा सोहळा होऊ शकला नाही मात्र मागच्या वर्षी हा सोहळा दिमाखात पार पडला. यंदाही या दैदीप्यमान सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूत दाखल झाले आहे. यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान झालं आहे. हताश असलेला शेतकरी तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पुढची शेती सुजलाम होऊ दे असं साकडं घालणार आहेत. यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. येणारं वर्ष नीट जाऊदे असं म्हणत तुकोबा चरणी शेतकरी विलिन होणार आहे. भाजनांनी सगळा परिसर दुमदुमला आहे.