सोलापूर : सीना नदीवर सोलापूर रत्नागिरी हायवेवर देशातील पहिला ब्रिज कम बंधारा तिऱ्हे येथे होत आहे. रस्त्याच्या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे येथे साडेसात कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष राम जाधव, अतुल गायकवाड, संग्राम पाटील, विशाल जाधव, ज्ञानेश्वर बंडगर, महेश पवार, नंदू पवार, राजू सदगर आदी उपस्थित होते. तिन्हे व परिसरातील तरुणांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना घराघरात पोहोचवाव्यात, विकासकामासाठी कोणतीही मदत लागली तर आपण सदैव तयार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. यावेळी तिऱ्हे – हिरज रस्ता ३ कोटी ५० लाख, तिरहे – कवठे रस्ता २ कोटी २५ लाख, तिन्हे- शिवणी रस्ता १ कोटी ४५ लाख यासह इतर विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.