नवी दिल्ली: देशातील कोरोना परिस्थितीवरून जगभरातून नरेंद्र मोदी सरकारवर टीका होत असतानाच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींवरील हल्ला अधिक तीव्र केला आहे. राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करून मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत.
राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरले आहे. देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम केलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.
जीएसटीवरून हल्ला
राहुल यांनी कालच मोदींवर जीएसटी वसुलीवरून टीका केली होती. जनतेचा जीव जात आहे. पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबलेली नाही, अशी टीका राहुल यांनी केली होती. या ट्विटसोबत त्यांनी जीएसटी हा हॅशटॅगही वापरला होता.
सोनिया गांधींचा निशाणा
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही कोरोना परिस्थितीवरून मोदींवर निशाणा साधला होता. कोरोना संकट रोखताना सिस्टिम फेल झालेली नाही. तर मोदी सरकार फेल झाली आहे. मोदी निवडणुकीत मश्गूल राहिले. कोरोना संकटाबाबत दिलेल्या इशाऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच कोरोना संकट रोखण्यासाठी तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे इशारे दिलेले असतानाही आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात आली नाही. ऑक्सिजन, औषधे आणि व्हेंटिलेटर आदी व्यवस्था उभारल्या नाहीत. नागरिकांना दिलासा देण्याऐवजी भाजपशासित राज्यातील सरकार हुकूमशहासारखे वागले. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावाही त्यांनी केला होता.