स्मारकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवताना संबंधित शेतकऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला मिळाला पाहिजे. स्मारकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाकडे 10 कोटीची मागणी करावी. राज्य शासनाकडून स्मारकासाठी 150 कोटीच्या निधी मंजूर असून 89 कोटीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी नियोजित वेळेला स्मारकाचे भूमिपूजन होण्यासाठी जलद गतीने काम करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
सोलापूर दि. 6 (जिमाका) : – राज्य शासनाने आरण येथील श्री संत सावता महाराज संजीवन समाधी स्मारकासाठी 150 कोटीचा निधी मंजूर केलेला होता त्यानंतर कोटी निधीसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. या स्मारकाच्या कामाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी भूमिपूजन करण्याचे नियोजित आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून घ्याव्यात, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, वसेकर महाराज, माढा प्रांताधिकारी ज्योती आव्हाड, मंगळवेढा प्रांताधिकारी अमित माळी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रीतम कुंटला, जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकासाठी आवश्यक असलेली जागेची भूसंपादन प्रक्रिया उप विभागीय अधिकारी माढा यांनी गतीने पूर्ण करून घ्यावी. संबंधित जागा मालकाकडून थेट खरेदी प्रक्रिया किंवा शासकीय विहित नियमावली प्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच यासाठी जागेचा मोबदला म्हणून जास्तीत जास्त निधी संबंधित जागा मालकांना मिळाला पाहिजे, या अनुषंगाने नगर रचनाकार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सदरची जागा गावठाण भागात येत असल्याबाबतचा अभिप्राय पाठवावा, असेही त्यांनी निर्देशित केले.
राज्य शासनाकडून 89.07 कोटी निधी ला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेला आहे. मंजूर निधीप्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवावी. या स्मारकासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा परिषद कामकाज पाहणार आहे. तरी जिल्हा परिषदेने हे स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना कराव्यात. यासाठी काही अडचणी असतील तर त्याही येथे मांडाव्यात. परंतु या सरकाचे काम कोणत्याही परिस्थितीत 24 ऑगस्ट रोजी सुरू झाले पाहिजे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून अत्यंत गतिमान पद्धतीने कामकाज करणे अपेक्षित असल्याचे श्री. गोरे यांनी सुचित केले. तसेच मंदिर परिसरातील आठ ते दहा एकर जागा भूसंपादनासाठी दहा कोटी मागणी प्रस्ताव पाठवण्याचेही त्यांनी सुचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी श्री संत सावता महाराज स्मारकाच्या अनुषंगाने प्रशासन गतीने काम करून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. स्मारकाच्या जवळील भूसंपादित करण्यात येणाऱ्या जागेच्या मालकाशी दोन ते तीन बैठका झालेल्या असून थेट भूसंपादनाची प्रक्रिया राबवून भूसंपादन करण्यात येईल, असे माढा उपविभागीय अधिकारी श्रीमती आव्हाड यांनी सांगितले.
श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक
मंगळवेढा शेजारील चोखामेळा नगर हद्दीतील कृष्ण तलावा शेजारील जागा श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेला आहे. यातील किमान 15 एकर जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच कृष्ण तलावाच्या सुशोभीकरणाचाही प्रस्ताव आराखड्यात घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. तसेच या स्मारकाचा आराखडा करण्यासाठी वास्तुविशारद यांची नियुक्ती करण्याबाबत ही सुचित करण्यात आले.
