सोलापूर, दि. 06 जानेवारी-सोलापूर येथील नागरी विमानसेवेचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्याचा चांगलाच पाठपुरावा केला असला तरी या ना त्या कारणास्तव या विमानसेवेला खीळ बसत असल्याने स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विमानसेवेबाबत आज (दि.06) एक बैठक घेवून संबंधित यंत्रणेला लवकर विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्देश दिले.सोलापूर विमानसेवेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिसीद्वारे घेतलेल्या बैठकीसाठी केंद्रीय उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय आणि राज्य एअरपोर्ट अॅथॉरिटीचे अधिकारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार,उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह स्थानिक प्रशासनातील प्रांत व इतर अधिकारी उपस्थित होते. या आयोजित बैठकीवेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूरच्या विमानसेवेतील अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानसेवेच्या संबंधित यंत्रेणेशी आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधून सोलापूरच्या विमानतळाबाबत असलेल्या आवश्यक त्या परवानग्यांची तत्काळ पूर्तता करून लवकरात लवकर ही विमानसेवा चालू करावी, असे निर्देश दिले. यामुळे येत्या महिनाखेर या विमानसेवा सुरू होण्याचे संकेत सध्यातरी मिळत आहेत.