राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच हवे, असे ते म्हणालेत. तर कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल, असे विधान करत त्यांनी या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. कोपरगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कोकाटे यांनी राज्यातील कृषी आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटला, मात्र, कर्जमाफीबाबत ठोस घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून सरकारविरोधात नाराजी सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्या विधानाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
नेमके काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल. शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत. मात्र कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.
बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा
कृषीमंत्री कोकाटे यांनी बोगस बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीविरोधातही ठाम भूमिका घेतली. बोगस बियाणे आणि औषधांसंदर्भात ज्या कृषीसेवा केंद्राच्या बाबतीत तक्रार दाखल होईल, त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. माझ्याकडे तक्रार आली तर मी लगेच कारवाई करणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.