काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचा जीव घेतला. याचाच बदला भारताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला. भारताच्या वतीनं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील तब्बल 9 दहशतवादी स्थळं बेचिराख करण्यात आली. हे ऑपरेशन राबवताना भारतानं पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यानंतर पाकिस्ताननं सीमेवर बेछूट गोळीबार सुरू केला. भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता, लष्करातील जवानांना सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. सुट्टी रद्द झाल्यानं लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववर देशासाठी बॉर्डवर हजर झाला. त्यानंतर नववधूनं प्रतिक्रिया देताना ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय, अशी प्रतिक्रिया दिली.
जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात भरती झाले. 5 मे रोजी मनोज पाटील यांचं लग्न झालं. लग्नाला दोन दिवस उलटत नाहीत, तोवर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तात्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोन दिवसांत मनोज पाटील देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर रवाना झाले. अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी तैनात झालेत. दरम्यान, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत.
अंगावरची ओली हळद अन् हातावर रंगलेली मेहंदी, सुट्टी रद्द करुन जवान कर्तव्यावर रुजू
नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील न्यानेश्वर पाटील यांचा मुलगा मनोज यांचं लग्न ठरलं. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आलेले. पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणं आलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आलेले, अशा सर्व जवानांना पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील मनोज न्यानेश्वर पाटील यांचा नुकताच 5 मे रोजी विवाह संपन्न झाला होता. पण, विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत. मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला. देशसेवेसाठी अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झाले. मनोज यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.