बीड-एकीकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचं राजकारण ढवळून निघाल्याचं चित्र आहे. त्याचसोबत वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली, समर्थकांनी आंदोलन उभं केलं. तर त्याच वेळी या जिल्ह्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी मात्र यापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येतंय. जिल्ह्यात काय सुरू आहे ते मला काही माहिती नाही, मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त आहे. माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. बीडमधील तणाव निवळावा यासाठी आपण गृहमंत्र्यांशी चर्चा करू असंही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येत आहे.
धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर परळीमध्ये त्याच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केलं. मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनीही धनंजय मुंडे यांच्यावर यावरून निशाणा साधला आहे. त्याचवेळी त्यांच्या बहीण आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र या सर्वापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येत आहे.
माझ्यासाठी रोजचं काम महत्त्वाचं
बीडमध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी माझ्या रोजच्या नियोजनाप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर करत नाहीत. माझ्यासाठी रोजचं काम महत्त्वाचं आहे अशी पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.