मुंबई : १०० व्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्यकर्मी आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनामुळे रखडलेल्या शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचं बिगुल अखेर वाजलं आहे. 5 जानेवारीपासून नांदीला सुरुवात होणार असून महाराष्ट्रभर शतक महोत्सवी नाट्य संमेलन पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यासंदर्भात घोषणा केली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व मुख्य निमंत्रक उदय सामंत आहेत. तंजावर येथे 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.